स्वच्छ प्रतिमा, हळव्या मनाचा सच्चा नेता | पाच वेळा आमदार असलेल्या अनिल देशमुखा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

363

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद आधी पूजा चव्हाण प्रकरण आणि नंतर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामुळे धोक्यात आले आहे.

त्यामुळे अनिल देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वच्छ प्रतिमा असलेले अत्यंत हळवे व सच्चे नेते आहेत.

आपल्या सच्चेपणाच्या जोरावर पाच वेळा आमदार राहिलेले अनिल देशमुख नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे, त्यांच्या प्रेरणादायी राजकिय जीवनाचा थोडक्यात आढावा!

वंचित, शेतकरी, बहुजनांसाठी लढणारा नेता

अनिल देशमुख हे 70 वर्षाचे आहेत. त्यांनी एम.एसस्सीपर्यंत शिक्षण घेतले आहे. नागपूरमधील काटोल हा त्यांचा मतदारसंघ आहे.

या मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आले आहेत. स्वच्छ प्रतिमेचे सच्चे, अतिशय हळवे व प्रामाणिक नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. वंचित, शेतकरी, बहुजनांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

अपक्ष आमदार म्हणून निवडून आले

नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर देशमुख यांनी 1995 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये ते मंत्रीही झाले. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी अनिल देशमुख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

त्यानंतर त्यांनी लगेच 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर काटोलमधून निवडणूक लढवली आहे. विजयी झाले. त्यानंतर 2004 मध्येही याच मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट्रीक केली.

अटीतटीची निवडणूक

2014ची विधानसभा निवडणूक अनिल देशमुखांसाठी ही सर्वात अटीतटीची होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात काटोलमधून आशिष देशमुख होते.

आशिष देशमुख हे त्यावेळी भाजपमधून काटोलमधून लढले होते. देशमुख विरुद्ध देशमुख अशी ही लढत नागपूरमध्ये चांगलीच गाजली होती. मात्र, या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी सहज विजय मिळविला.

त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट देण्यात आले आणि देशमुखांनी या निवडणुकीतही बाजी मारली.

कायम मंत्रीपद

देशमुख पहिल्यांदा 1995मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. अपक्ष आणि पहिल्याच टर्मचे आमदार असूनही युती सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर देशमुख यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2014 ते 2019 हा काळ वगळल्यास देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलंय. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली.

1999 ते 2001 या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्रिपद, 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर 2009 मध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला.

राष्ट्रगीताची सक्ती ते गुटखा बंदी

मंत्री म्हणून देशमुख यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्याची चर्चाही झाली. सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी सिनेमागृहात राष्ट्रगीत सक्तीचे केले होते.

अन्न व औषधीद्रव्य मंत्री असताना गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. ते बांधकाम मंत्री असतानाच वांद्रे-वरळी सी लिंक बांधून पूर्ण झाला होता.

लॉकाडाऊन आणि देशमुख

लॉकडाऊनच्या काळात देशमुखांनी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले. राज्यभरातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्यांनी पोलिसांचं मनोबल वाढवले.

एखाद्या पोलिसाचा वाढदिवस साजरा कर, त्यांचा सत्कार कर, आजारी पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस कर, चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो ट्विट करून त्यांचं कौतुक केले. अनेक गोष्टींवर त्यांनी भर दिला, आणि पोलिसांचं मनोधैर्य वाढवले.

या काळात ते सतत पोलिसांच्या संपर्कात होते. केवळ कार्यालयात बसून न राहता ग्राऊंडवर जाऊन ते पोलिसांशी संवाद साधत होते.

भूषविलेली मंत्रिपदे

  • 1995 – कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य (युती सरकार)
  • 1999 – राज्यमंत्री, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क (आघाडी सरकार)
  • 2001 – कॅबिनेट मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन (आघाडी सरकार)
  • 2004 – कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम (आघाडी सरकार)
  • 2009 – कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (आघाडी सरकार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here