मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही महराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे.
यात एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात कठोर निर्बंधांची शक्यता
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे आता राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं कळंतय. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊन बाबत विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले होते.
त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन
कोव्हिडचा समूह संसर्ग टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश काढले आहेत.
26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे.
याआधी बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला होता.
13 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. बीडसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- ठाणे
- नाशिक
- औरंगाबाद
- नांदेड
- जळगाव
- अकोला
तर कर्नाटकातील बंगळुरु शहराचाही पहिल्या सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये नाव आहे. त्यामुळे देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील कोरोना स्थिती किती विदारक बनली आहे याचा अंदाज येऊ शकतो.