बारामती : कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आरोग्य यंत्रणाही कमी पडत असल्याचे पहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीत तर कुठे रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
गंभीर कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने काही नागरिक याचा गैरफायदा घेतला जात आहे.
सध्या भांबावून गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करत आहेत. अशाच एका टोळीचा पर्दाफाश बारामती पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी चौघांना केली अटक
रेमडेसिवीरच्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल मिसळून रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रेमेडसिवीर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक केल्यानंतर त्याने तोंड उघडल्यावर ही धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
गोरखधंदा असा सुरू होता
बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलावल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतले गेले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणून देत होता.
त्यानंतर सिरींजने पॅरासिटामॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता. हे रॅकेट समोर आल्यानंतर डॉक्टर व रुग्णामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.