महाविकास आघाडी सरकारमध्ये आता खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
सोबतच दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीनंतर आता नाना पटोलेही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्या करता वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे.
काँग्रेसकडून काही अंतर्गत बदल केले जाणार आहे का, याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी मंत्रिमंडळ फेररचना संदर्भात महाविकास आघाडीत मोठ्या हालचालींना वेग आला आहे.
शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यातील परीस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष करून सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला टिकेला सामोरं जावं लागतं आहे. या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये बदल करायचे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
अनिल देशमुखांची विकेट पडणार?
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे यांच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदल संदर्भातही महत्वाची चर्चा झाली.
शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर गेले वर्षभर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते.
सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे.
अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे.
वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसमध्ये होणार अंतर्गत फेरबदल?
तसंच काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्तं करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळात फेर बदलाचे संकेत मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पवारांनी बोलावली बैठक
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे.