महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासा बातमी | महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट लवकरचं ओसरेल : तज्ञांचा दावा

1016
Corona Update Latur

देशातील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे.

मागील अनेक दिवसांपासून याच आकडेवारीच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आहे. एकीकडे ही आकडेवारी छातीत धडकी भरवणारी असली तरी दुसरीकडे या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

६० हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर झालेली असल्याने महाराष्ट्रामध्ये करोना लाटेचा सर्वोच्च बिंदू म्हणजेच कोव्हिड वेव्हचा पिक अर्थात उच्चांक गाठल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासाठी वाईटातून चांगले अशी आहे.

गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ६१ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले. सध्याच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ही ६३ हजार २९४ इतकी आहे. मागील रविवारी म्हणजेच, ११ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पाच दिवस रुग्णसंख्येची वाढ ६० हजारांच्या आसपास आहे.

मागील आठवडा हा मार्च महिन्यापासून सर्वाधिक स्थिर रुग्ण संख्या असणारा आठवडा ठरला. यासंदर्भात आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक असणाऱ्या मनिंदर अग्रवाल यांनी, महाराष्ट्राने करोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भातील आकडेवारी तरी तसंच दर्शवत आहे.

पुढील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचे आपल्याला पहायला मिळाले, असे मत नोंदवले आहे. देशातील करोना संसर्गासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम अग्रवाल करत आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये करोना रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून आला आहे किंवा त्यांची वाटचाल उच्चांकाच्या आसपास आहे. खास करुन पुण्याने तर उच्चांक गाठलाय असे मला वाटते, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ ही पुण्यात झालेली दिसून आली. देशभरातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या शहरांच्या यादीतही पुण्याचा समावेश झाल्याचे पहायला मिळाले.

राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली त्या दिवशी म्हणजे ११ एप्रिल रोजी पुण्यात करोनाचे १२ हजार ५९० रुग्ण आढळून आले होते. मात्र त्यानंतर पुण्याऐवजी दिल्लीतील आकडेवारी वाढत असल्याचे चित्र दिसले.

पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही करोना रुग्णसंख्या कमी होईल असा अंदाजही अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

आमच्या अपेक्षेप्रमाणेच छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णसंख्या वाढ दिसून आली आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढ अशीच होत राहिली तर पुढल्या आठवड्याभरात या राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल.

देशामध्येच २५ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता असल्याने त्याचाही हा परिणाम असू शकतो, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केलं.

कंप्युटरच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या करोना रुग्णसंख्येसंदर्भातील डेटाबेस हा आतापर्यंत योग्य अंदाज व्यक्त करत आलाय, असे अग्रवाल सांगतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानचे आकडे अग्रवाल आणि त्यांच्या टीमने अचूक पद्धतीने सांगितले होते.

मात्र दुसऱ्या करोना लाटेचा एवढा परिणाम होईल असं या टीमला वाटले नव्हते. अनेक वैज्ञानिकांनी अग्रवाल आणि त्यांच्या टीमच्या या मॉडेलवर टीका केलीय. मात्र नवीन माहितीनुसार आम्ही सतत आमचे मॉडेल अपडेट करत असल्याचे अग्रवाल सांगतात.

गुरुवारी देशात दोन लाख १७ हजार रुग्ण आढळून आले. मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी घटल्याचे दोन महिन्यात पहिल्यांदाच दिसून आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील होते.

मागील काही दिवसांमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या चार पटींने वाढली आहे. ५२ हजार रुग्णांवरुन आज रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढेच आहे.

मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही केवळ दुपट्टीने वाढलीय हे सुद्धा महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याचे संकेत आहेत असं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here