परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (सीसीआय) जिल्ह्यातील चार केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (दि. २७) ६ हजार ८३७ शेतकऱ्यांच्या १ लाख ६३ हजार ८५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.
भारतीय कापूस महामंडळाच्यावतीने गुरुवारी (दि. १९) ते सोमवार (दि. २३) या कालावधीत जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, पू्र्णा या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांर्तगत हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. खुल्या बाजारातील तसेच खेडा पद्धतीने कमी दराने खरेदी केली जात आहे.
त्यात राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार ५१५ रुपये तर लांब धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ८२५ रुपये आहे.
शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणताना सोबत सात बारा उतारा, आधारकार्ड, बॅंक खाते पुस्तक यांच्या सत्यप्रती घेऊन याव्यात. चुकारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून येणे आवश्यक आहे, असे निर्देश बाजार समित्या तसेच सीसीआयतर्फे देण्यात आलेले आहेत.
प्रत्येक बाजार समितीत शासकीय खरेदी केंद्र हवे
जिल्ह्यातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी आजवर केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परभणी, बोरी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या सात कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गत अद्याप हमीभावाने कापूस खरेदी सुरू झालेली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी करून व्यापारी लूट करीत आहेत. दूर अंतरावरील केंद्रांवर कापूस नेण्यासाठी वाहन भाड्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. केंद्रांवर वाहनांची गर्दी होत असल्याने मोजमापास वेळ लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक बाजार समितीमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कापूस खरेदी स्थिती (क्विंटल)
खरेदी केंद्र | शेतकरी संख्या | कापूस खरेदी |
जिंतूर | ५२३ | ११९२६ |
सेलू | ३४४६ | ८८४८३ |
मानवत | २७५४ | ६०४१९ |
पूर्णा | ११४ | ३०२२ |