मुंबई : मोदी सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कडाडून टीका केली.
मात्र ही टीका करतानाच, अजितदादांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं अभिनंदन केले.
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर, नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचं या घडीला तरी दिसत नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांनी, अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केवळ नाशिक आणि नागपूरकरांचं अभिनंदन केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत त्यांनाही झाली नाही, कारण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही नाही, याची जाणीव त्यांनाही झाली आहे.
‘आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सुचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा. महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
त्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,’ अशी मिश्किल टिप्पणीही अजितदादांनी केली.
तिन्ही कृषी कायदे रद्द करा!
‘किमान हमी भाव योजनेंतर्गत ४३ लाख शेतकऱ्यांना ७५ हजार कोटी रुपये दिल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. सरकार शेतकऱ्यांच्या हिताबाबत इतकंच गंभीर असेल तर संसदेत विनाचर्चा घाईघाईनं मंजूर केलेले तीन कृषी कायदे याच अधिवेशनात तात्काळ रद्द करावेत.
शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा आणावा. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना सन्मानानं घरी जावू द्यावं, अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे.