महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत कोरोनावरील लसीची टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या येत असतानाच आता देशाची राजधानी दिल्लीतही लस टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
लसीचा केवळ चार ते पाच दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असून केंद्राने पुरेसा लस पुरवठा करावा, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सर्व वयोगटातील लोकांना लस देण्याच्या अनुषंगाने केंद्राने परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला पाठविले असल्याची माहितीही जैन यांनी दिली.
केवळ दवाखाने आणि आरोग्य केंद्रामध्येच लस देऊन भागणार नाही तर शिबिरे भरवून लसीकरणाचे काम करावे लागेल, असे जैन यांनी नमूद केले. लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार महाराष्ट्र, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यांनी नुकतीच केली होती.
दुसरीकडे आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप केले जात असून लसीचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काही राज्यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले होते. विशेष म्हणजे लसीचा साठा संपल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरणाचे काम बंद पडलेले आहे.
दरम्यान, झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनीही केंद्र सरकार आमच्याबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही दोनवेळा दहा लाख डोसेसची मागणी केली होती.
मात्र आतापर्यंत लस आली नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या एक दोन दिवसांत लसीचा साठा संपणार असून अनेक जिल्ह्यात लसीकरणाचे काम बंद पडले असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांचा लस साठा राहिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. तर आंध्र प्रदेशातील लसीचा साठाही लवकरच संपण्याची शक्यता आहे.