लातूर : उदगीर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु झालेली आहेत.
या योजनेचे गुत्तेदार कामे फार संथगतीने करत असून कामाची गती वाढविण्याची गरज आहे.
त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करून दिनांक 31 मार्च अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वित होऊन उदगीर शहराला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उदगीर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता लोलपोड, उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पातील मुख्य विहिरीचे काम कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण केले पाहिजे.
मुख्य विहिरीपासून हकणकवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनचे काम ही वेळेत पूर्ण केले गेले पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.
या 48 किलोमीटर पाईपलाईन पैकी 38 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दहा किलोमीटरचे जे काम बाकी आहे ते पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी निर्देशित केले.
उदगीर शहरात पाच पाण्याच्या टाक्या असून त्या पाण्याच्या टाक्याची साठवण क्षमता मोठी आहे; परंतु त्याच्या किरकोळ दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे.
त्यासाठी गुत्तेदार यांनी याबाबत अधिक गतीने काम करावे. त्याप्रमाणेच शहरात पाणी वितरणासाठी 131 किलोमीटर पाईपलाईनची आवश्यकता असून आतापर्यंत 83 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे.
तरी उर्वरित पाईपलाईनचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी व योग्य क्षमतेने पाणी शहराला मिळेल यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
तसेच कंत्राटदार यांनी कामाचे नियोजन करुन 31 मार्च पर्यंत काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. मजीप्राने प्रकल्प व्यवस्थापण सल्लागार म्हणुन कामावर दररोज देखरेख करुन दैनिक अहवाल कंत्राटदाराकडून घेवून नगर परिषदेस अवगत करावे.
वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांनी हकनाकवाडी, कुंमठा, लिंबोटी, जुने जलशुध्दीलकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा संबंधी कामे 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश ना.बनसोडे यांनी यावेळी दिले.
तसेच योजनेच्या पंपीग मशिनरीचा पुरवठा लवकरात लवकर करुन पाणी पुरवठा चालु करण्या संबंधी कार्यवाही बाबत पंपीग मशिनरीचे कंत्राटदार यांना सुचना दिल्या.
तसेच शहरातील सिमेंट कॉक्रीट रोड पॅचवर्कचे काम प्राधान्याने नगर परिषदच्या मार्गदर्शनानुसार पुर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
अमृत योजनेचे संबंधित गुत्तेदार यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये मोठ्याप्रमाणावर कुचराई झालेले दिसून येत आहे तरी संबंधित ठेकेदारास शेवटची संधी म्हणून 31 मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
उदगीर शहराला लवकरात लवकर पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद उदगीर व संबंधित गुत्तेदार यांनी परस्परात समन्वय ठेवून कामे अधिक गतीने पूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या.
प्रारंभी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर शहरात सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सद्यस्थिती बैठकीत मांडली.