आमटे कुटुंबीयांमधील वाद का चिघळला? शीतल आमटे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे!

328

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे-करजगी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. आज दुपारी शीतल आमटे यांनी केलेल्या आत्महत्येने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे.

शुक्रवारी 20 तारखेला शीतल यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे आमटे कुटुंबीयांवर आरोप केले. त्यावर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश – डॉ. मंदाकिनी आमटे यांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत.

शिवाय डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनीही या निवेदनावर स्वाक्षरी करून डॉ. शीतल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोशल मिडीयावर महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर अनुचित वक्तव्यं केली.

त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

नेमके प्रकरण काय?

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला.

यात आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदनात सांगितल्या प्रमाणे महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप केले गेले.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी या संभाषणात त्यांचे सख्खे भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बेछुट आरोप केले. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.

डॉ. शीतल यांच्या निवेदनामुळे समाजात कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे कुटुंबीय संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं निवेदनात सांगण्यात आलं आहे.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांची प्रतिक्रिया

“दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं,” अशी माहिती डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

आमटे कुटुंबियांचा मूळ वाद काय?

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर त्यांच्या समाजसेवेचा वसा त्यांची दोन मुलं आणि सुनांनी सांभाळला. आमटेंची तिसरी पिढी डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. शीतल-कोस्तुभ यांनी बाबा आमटे यांचं काम हातात घेतलं.

आमटे कुटुंबीयांच्या सर्व सामाजिक संस्था या महारोगी सेवा समितीच्या नावाखालीच काम करतात आणि त्यांचं बँक अकाऊंटही एकच आहे.

सन 2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना स्थान देण्यात आलं.

याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला. पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान डॉ. शीतल आमटे-कराजगी यांना आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद देण्यात आलं आणि त्यांचे पती गौतम-करजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

मल्टी नॅशनल कंपनीत कामाचा अनुभव असणाऱ्या गौतम यांनी आनंदवनाच्या कारभारात कार्पोरेट कंपनीसारखी आधुनिकता आणि शिस्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असल्याच सांगत अनेक नवे नियम लागू केले.

आनंदवनातील वाद पोलीस ठाण्यात कसा पोहोचला?

नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतांनाच आनंदवन राहणाऱ्या दोघांनी नाराजी उघड केली आणि वादाची ठिगणी पडली.

डॉ. विकास आमटे यांचा सहाय्यक आणि सावली सारखा त्यांच्या सोबत राहणाऱ्या राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरू केलं.

माजी सरपंच असलेल्या आणि सध्या आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य राजू सौसागडे यांनी या वादानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळाल्याच पोलीस तक्रारीत सौसागडे यांनी सांगितलं.

नव्या व्यवस्थापनाने आपल्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या. ऑफिसात बोलावून अपमान केला. त्यामुळे सौसागडे यांनी दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अन्वयेही तक्रार नव्या प्रशासनाविरोधात केली.

आनंदवनातील मतभेद तसंच परस्पर आरोप-प्रत्यारोप याच घटनेपासून चव्हाट्यावर आले. दरम्यान बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनीही नव्या प्रशासनावर आरोप केले.

महारोगी सेवा समितीच्या आनंदवनाची रचना कशी आहे?

गेल्या 72 वर्षापासून महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पात कृष्ठरुग्णांवर उपचार केले जातात. कृष्टरुग्णांचे कुटुंबीय जर असतील तर त्यांना आनंदवनातच वेगळं घर देऊन त्याचं पुनर्वसन केलं जातं.

जर कृष्ठरुग्ण एकटे असतील तर त्यांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते. आजमितीस आनंदवनात एकूण 1500 लोक वास्तव्यास आहेत. यातील 450 कुटंबीय आहेत तर 400 लोक एकटे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here