बालकांना जगण्याचे बळ देणारी अंगणवाडी हे संस्कार मंदिर : राहुल केंद्रे

250

लातूर : हसरे मुल जगाचे व रडके मुल आईचे असे म्हटले जाते.

मात्र सर्व लेकरांना ममता व जगण्याचे बळ देणाऱ्या अंगणवाडी हे उद्याच्या उज्वल भारताचे संस्कारकेंद्र आहेत.

लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी दर्जेदार करून त्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या केल्या जातील अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली.

लातूर जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांचे रूप बदलण्याचा निर्णय केला असून जिल्ह्यातील पहिल्या हॅपी होम अंगणवाडीचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आ.बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती राठोड, समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, जि.प.चे माजी सभापती बापूसाहेब राठोड, पं.स.सभापती जमुनाताई बडे, जि.प.सदस्य हर्षवर्धन कसबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गिरी, सरपंच मधुकर मुंढे, गटविकास अधिकारी निला आदी उपस्थित होते.

अंगणवाडी हे बालकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे केंद्र आहे.

ज्या चिमुकल्यांना सांभाळताना घरातील नातेवाईक परेशान होतात त्या बाळांना निष्ठेने ,ममतेने सांभाळणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

त्या तुलनेत अंगणवाडी ताई व सेविकांना मिळणारे मानधन कमी आहे.

या अंगणवाडी कर्मचाऱ्याना दुप्पट वेतन मिळावे असा ठराव लातूर जिल्हा परिषद करणार असून यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे राहुल केंद्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लातूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे मुल्यमापन करण्यात आले असून या सर्व अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार आहे.

पारंपरिक अंगणवाडीच्या तुलनेत आता नवीन हॅपी होम अंगणवाडीतून बलशाली भारताच्या बलशाली नागरिकांची निर्मिती होईल असा विश्वास अध्यक्ष केंद्रे यांनी पुढे बोलताना व्यक्त केला.

या कार्यात समाजाचा, लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगून यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन केले.

2408 पैकी 380 अंगणवाडीचे आज ‘हॅपी होम’ मध्ये रुपांतर झाले आहे.

आगामी सहा महिन्यात 1100 अंगणवाड्यासाठी हे उद्दिष्ट असून हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी केला.

आधुनिक अंगणवाडीमध्ये परसबाग, एल.ई.डी.स्क्रीन, आधुनिक बोलकी चित्रे, खेळणी असतील.

अंगणवाडी नव्या व बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक झाली असून हा बदल राज्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी असेल असा विश्वासही राहूल केंद्रे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here