पुणे: अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याचे सांगत अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले आहेत.
अण्णा अनरिलायबल( विश्वास न ठेवण्याजोगे) आणि मॅनेजेड समाजसेवक असल्याचा घणाघातही डॉ. मुणगेकर यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन आपले उपोषण स्थगित करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
डॉ. भालचंद्र मुणगेकर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारवर देखील टीकेचे प्रहार केले.
2009मध्ये त्यांनी केलेलं आंदोलन हा त्यांच्या प्रसिद्धीसाठीच्या नियोजनाचा भाग होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा काय उल्लेख करायचे हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटा मुणगेकर यांनी काढला.
आपल्या पूर्वी केलेल्या आणि अजूनही प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा इशारा दिला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
मात्र, त्याच्या एक दिवस आधीच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला.
त्यामुळे हे उपोषण अण्णांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सडकून टीका केली आहे.
अण्णा हे हास्यास्पद व्यक्तीमत्व असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर अण्णा हे अविश्वासू प्रकारचे व्यक्तीमत्व असून ते मॅनेज होतात, असा गंभीर आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्यात शेतकरी नव्हते
शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून शांततेत आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. कृषी कायदे रद्द केल्याने कायदे रद्द करण्याचा पायंडा पडणार नाही, असं सांगतानाच लाल किल्ल्यावर जे झालं. त्यात शेतकरी नव्हते. एवढ्या सुरक्षेत तो व्यक्ती झेंडा लावूच कसा शकतो? असा सवालही त्यांनी केला.
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं दिसत नाही
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक ठरला आहे.
काल आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर झाला. हे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे चमत्कारीकच होतं. 11 टक्के अर्थव्यवस्था सुधारेल असं सांगण्यात आलं. असं सर्व्हेक्षणच शक्य नाही.
पाच टक्के सुद्धा अर्थव्यवस्था सुधारणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं मला तरी वाटत नाही, असं ते म्हणाले. तसेच मोदी सरकार अर्थव्यवस्थेला किरकोळपणे घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नेहरूंनी उभं केलेलं प्लॅनिंग कमिशन मोदींनी बरखास्त केलं. सरकार आणि जनतेमधील दुवा म्हणजे प्लॅनिंग कमिशन होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.