उमरिया : मध्यप्रदेशातील उमरियामध्ये घृणास्पद प्रकार समोर आला आहे.
एका 13 वर्षीय मुलीवर 9 लोकांनी 3 दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दोघांकडून गँगरेप करण्यात आला, त्यानंतर सतत तीन दिवस तिच्यावर तिघांनी बलात्कार केला.
या मुलीने ज्या लोकांकडे मदत मागितली, त्यांनीही मुलीचा फायदा घेत बलात्कार केला.
मुलीने कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली असून पोलिसांनाही घटना ऐकून धक्का बसला आहे.
पोलिसांनी कारवाई करत तातडीने 9 पैकी 7 आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील जबलपूरमध्ये सरकारी नोकरी करतात.
मुलगी देखील तेथेच राहून शिक्षण घेत होती. परंतु लॉकडाउनमध्ये ती आईकडे उमरिया येथे आली.
11 जानेवारी रोजी मुलगी बाजारात गेली असता, दोघे जण तिला एका दुकानात घेऊन गेले.
तिच्याकडून जबरदस्तीने मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर तिला बाईकवर फिरायला घेऊन गेले.
दोन आरोपी तिला जंगलात घेऊन गेले आणि बलात्कार केला.
त्या दिवशी तिला एका ढाब्यावर ठेवलं आणि त्यावेळी इतरही आरोपी पोहचले होते. त्यांनीदेखील मुलीवर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी रोजी मुलीने घरी जाण्यासाठी विनवणी केली.
आरोपींनी एका ड्रायव्हरसोबत तिला ट्रकमध्ये बसवलं.
रस्त्यात ट्रक चालकानेही जबरदस्ती करत, तिला मध्येच रस्त्यात सोडून दिले.
मुलीने पुन्हा उमरिया जाण्यासाठी ट्रक चालकाकडे लिफ्ट मागितली.
त्याने देखील जबरदस्ती केली आणि नंतर उमरियाजवळ सोडलं.
मुलीने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.