एपीआयने लग्नाचे आमिष दाखवून केला सहकारी पीएसआयवर बलात्कार | गुन्हा दाखल

639

मुंबई : आपल्याच महिला सहकारी अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून सहायक पोलीस निरीक्षकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिला पाेलीस उपनिरीक्षकाने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार संदीप शिवाजी पिसे याच्यावर डोंगरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिसे कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत आहे. मागील ८ वर्षांपासून आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवले होते. मागील महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने महिला पाेलीस उपनिरीक्षकाने आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पाेलिसांत दाखल केली आहे.  त्यानुसार पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक चाैकशी करत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही १०८ क्रमांकाच्या पीएसआय तुकडीचे अधिकारी आहेत. २०१३ मध्ये दोघे डोंगरी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. त्यावेळी पिसे व तिचे प्रेमसंबंध जुळून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

मात्र त्यानंतर गेल्या वर्षी त्याची पदोन्नती झाली तर महिला उपनिरीक्षकाची पुण्याला बदली झाली. दाेेघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मात्र दरम्यानच्या काळात दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. ती नेहमी त्याला फाेन करत हाेती. तसेच त्याच्याकडे वारंवार लग्नाची विचारणा करत हाेती. मात्र याबाबत निर्णय घेण्यात तो टाळाटाळ करीत होता.

गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याचे महिला पाेलीस उपनिरीक्षकाला कळल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली.

एपीआय पिसेवर बलात्कार, फसवणूक, विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here