मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारली आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांनाच इशारा दिला आहे.
छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत.
त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचे असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे म्हणत थेट भुजबळांना दम दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असे होत नाही.
बंगालमधील पराभवाचे दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवे, वर्षानुवर्षे तिथे सरकारमध्ये असलेले नेस्तनाबूत झाले आहेत, असे पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूलच्या पारड्यात आपली मते टाकली. देशात आता भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती आहे. भाजप विजयी झाला की प्रामाणिकपणे कारभार होणार आणि तुमची प्रकरणे बाहेर काढणार ही भीती असते. त्यामुळे काहीही करा पण भाजपला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला, असेही पाटील म्हणाले.
भुजबळ काय म्हणाले?
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. ‘मै अपना बंगाल नहीं दुंगी’ अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती.
मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही, असं भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही. भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे.
याकाळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावाला ही सापडणार नाही. पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असं भुजबळ म्हणाले.