‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याची कृत्रिम टंचाई | महागडे बियाणे माथी मारण्याचा प्रयत्न !

389

लातूर : खरीप हंगामासाठी अद्याप बियाणे विक्रीला जोरदार सुरुवात झालेली नसतानाच बाजारात ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.

प्रमुख विक्रेत्यांकडे पुरवठा होऊनही बियाणे नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्याशिवाय पर्याय नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

संपूर्ण वर्षभर सोयाबीनला चांगला दर मिळत असल्‍याने यंदा हे क्षेत्र बऱ्याच प्रमाणात वाढेल, असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

गेल्या हंगामात परतीच्या पावसाने ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेस धुमाकूळ घातल्याने बऱ्याच भागात या पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाण्यासाठी सहज उपलब्ध झालेले नाही.

बाजारपेठेत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी सुद्धा सोयाबीन विक्री करून मोकळे झाले आहेत. मध्य प्रदेशातील बहुतांश बियाणे कंपन्यांनी राज्यातील विविध भागातून सोयाबीन खरेदी करून नेले आहे.

पावसामुळे ‘महाबीज’चा बीजोत्पादन कार्यक्रमही यंदा प्रभावित झाला होता. त्यामुळे ‘महाबीज’ला गेल्या हंगामा एवढे बियाणे यंदा देणे जुळून आलेले नसल्याची चर्चा आहे.

मागील हंगामात सुमारे सव्वा दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणे ‘महाबीज’ने बाजारपेठेत उपलब्ध करून दिले होते. यंदा जेमतेम दोन लाख ५ हजार क्विंटलचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी अर्धेअधिक पुरवठा बाजारपेठेत झालेला आहे.

अद्याप हंगामाला १५ ते २० दिवसांचा वेळ आहे. असे असतानाही आत्ताच बाजारातून ‘महाबीज’चे बियाणे संपल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. काही जणांकडे ‘महाबीज’चे सोयाबीन आलेले असतानाही ते शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत.

बियाणांची टंचाई निर्माण करून महागडे बियाणे माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘महाबीज’चे बियाणे गेल्या वर्षाच्याच दरात यंदाही विक्री केले जात आहे. दुसरीकडे खासगी कंपन्यांचे बियाणे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

काही कंपन्यांच्या २५ किलो वजनाच्या गोणीची किंमत थेट ४००० रुपये झालेली आहे. तर महाबीजच्या ३० किलो बियाण्याच्या गोणीचा दर २२५० रुपये आहे. त्यामुळे शेतकरी महाबीजला प्राधान्य देत असतात.

खासगी कंपन्या व महाबीजच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याकडे अधिक आहे. याचा फायदा आता विक्रेत्यांकडूनही उठविणे सुरु झाले की काय, अशी परिस्थिती बनविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here