पवारसाहेबांना एकदा ‘त्याबद्दल’ विचारावं? चंद्रकांत पाटलांची अजित पवारांना कोपरखळी

201

मी पुण्यात राहिलो काय? कोल्हापूरला किंवा नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई – पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. 

त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, असा सवाल विचारला होता. यावर चंद्रकांत पाटलांनी, हुरळून जाऊ नका, पक्षाने एका मिशनवर पाठवले आहे, असा टोला हाणला आहे.

तसेच, राष्ट्रवादीत शरद पवारांचाच शब्द अंतिम असल्याचं सूचवत अजित पवारांना खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.

अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, त्यांनी त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मी वारंवार म्हटलंय की, उद्या महाराष्ट्रामध्ये काही मोठी पोझिशन देण्याची वेळ पवारांवर आली, तर ते कोणाला देणार आहेत हे त्यांनी पवारसाहेबांन विचारुन घ्यावं, असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे. 

माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे पाटील म्हणाले. माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होते.

त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झाले की परत कोल्हापूरला जाणार. हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच, विरोधक बाहेरचे आहेत.

त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असे त्यांना वाटते. अजित पवारांना आमच्या पक्षाचं काय पडलंय? त्यांनी जरा त्याचं बघावं. त्यांनी काय म्हटलं याच्याशी माझा काही संबंध नाही.

माझी बॅग भरलेलीच 

पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील सेफ मतदारसंघ निवडल्याच्या आरोपांना नेहमी सामोरे जावे लागते. त्यामुळे पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्षच मी कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले.

तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे.

यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते.

माझी बॅग भरलेलीच आहे. आम्हाला पक्ष सांगेल त्या ठिकाणी जावे लागते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही.

पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here