मद्य व गुटखा सुपारी शौकिनांसाठी चक्क टरबुजातून गुटखा, जर्दा सुपारी, खर्रा तसेच फळांचा ज्युस असल्याचे भासवत जेवणाच्या पार्सलमधून विदेशी मद्य पाठवण्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.
यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना त्यांच्याच नातेवाईकांकडून गुटखा, जर्दा तोटा व खर्रा यासोबतच मद्य पाठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.
मात्र वैद्यकीय महाविद्यालयात सेवेत असलेले सुरक्षारक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कतेने संबंधित प्रकार उघडकीस आला.
-
गुटखा, सुपारी व मद्य शौकिनांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाच्या नातेवाईकांनी चक्क टरबुजातून खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर काही जणांनी रुग्णांना विदेशी मद्य सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला.
रुग्णाला विदेशी मद्य पाठवताना कोणाला शंका येऊ नये यासाठी ते फळांचे ज्युस किंवा घरचे जेवण आहे असे वाटावे या पद्धतीने अल्युमिनियमच्या पॅकेटमध्ये सिल्व्हर फॉईल लावून पॅक करुन पार्सल दिले होते.
मात्र सतत ठराविक रुग्णाला असे पार्सल का येते? याचा संशय सुरक्षा रक्षकांना आला. तेव्हा त्यांनी ते पार्सल उघडून पाहिले असता त्यात दारु असल्याचे समोर आले.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आले असतात.
यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शौकिनांची तल्लफ भागवण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला.