नवी दिल्ली : तुमच्या फोन कॉल्सआधी वाजणारी कॉलर ट्यून आजपासून बदलणार आहे. कोरोना संक्रमणापासून बचाव आणि संरक्षणासाठी जागृती निर्माण करण्यासाठी ऐकू येणारी कॉलर ट्यून आता बदलणार आहे.
नव्या कॉलर ट्यूनमध्ये एका महिलेचा आवाज आहे. COVID-१९ लसीकरण अभियानाबद्दल जागृतीसाठी याचा उपयोग केला जाईल.
या ट्यूनमध्ये म्हटलं आहे, नव्या वर्षाने लसीकरणाच्या रूपात आशेचा एक नवा किरण आणला आहे. भारतात विकसित लस सुरक्षित आहे, प्रभावी आहे.
नवीन कॉलर ट्यून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असेल आणि जसलीन भाल्लाच्या आवाजात ही कॉलर ट्यून असेल. या कॉलर ट्यूनमधून नागरिकांमध्ये लसीबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून आता ऐकू येणार नाही. आता या कॉलर ट्यूनऐवजी एक नवी ट्यून ऐकू येणार आहे. याची सुरूवात देशात लसीकरणाच्या आधी केली जाणार आहे.
जसलीन भल्ला कोण आहे?
जसलीन भल्ला ही एक सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर कलाकार आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान ती अचानक चर्चेत आली होती.
त्यावेळी अचानक लोकांना डिफॉल्ट कॉलरट्यून म्हणून जसलीनच्या आवाजातील रेकॉर्ड संदेश ऐकू आला. ‘कोरोना वायरस या कोविड-१९ से आज पूरा देश लड रहा है. मगर, याद रहे हमें बीमारी से लडना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें…’असा हा संदेश होता.
नकोशी झाली होती कॉलर ट्यून
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून हटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
कॉलर ट्यूनमध्ये मूळ कोरोना योद्ध्यांचा आवाज असावा. यामुळे अमिताभ बच्चन यांचा आवाज कोरोना कॉलर ट्यूनमधून हटवण्यात यावा, असे याचिकेत म्हटले होते.
बच्चन स्वत: आणि त्यांचे कुटुंबीयातील काही सदस्य कोरोनाने संक्रमित झाले होते. त्यामुळे लोकदेखील ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत होते. कुणालाही फोन लावण्याआधी ही कॉलर ट्यून ऐकू येत होती.