Rekha Jare’s Assassination | बाळ बोठेला तब्बल १०२ दिवसानंतर अटक, रेखा जरेंचा नेमका खून कसा झाला?

221
Bal Bothe

अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठेच्या पोलिसांनी (ता.१३) मुसक्या आवळल्या आहेत. 

पारनेर येथील न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. बोठेला न्यायालयाने येत्या 9 एप्रिल पर्यंत स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले असून, हजर न राहिल्यास त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार होती.

गाडीला कट लागल्याच्या शुल्लक वादातून नगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ही घटना ३० नोव्हेंबरच्या रात्री आठच्या सुमारास पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील जातेगाव फाटा येथे घडली.

कशी झाली हत्या 

जरे या  सायंकाळी पुण्याहून नगरकडे कारने येत होत्या. जातेगाव फाट्याजवळ एका मोटारसायकलला त्यांच्या कारला कट लागला. मोटारसायकलवरील दोघांनी जरे यांची कार थांबवली.

त्‍याच्‍यात वाद झाला, वाद वाढल्यानंतर मोटारसायकलवरील एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्‍या गंभीर जखमी झाल्या.

यावेळी त्‍यांच्‍याबराोबर त्यांचा मुलगा, आई व नगर येथील डॉक्टर माने या होत्या. जरे यांना जखमी अवस्थेत नगरला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.

माने यांचा जबाब ठरला महत्वाचा

नगर येथील महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांचा जबाब नोंदविला. त्यांनी हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

त्या म्हणाल्या, ‘त्या दिवशी आम्ही पुण्यावरून येत होतो. रेखा जरे यांचा पाय दुखत होता, म्हणून त्यांनी सुरुवातीला मला कार चालवण्यास सांगितली होती.

मात्र त्यांच्या मुलाने नंतर रेखा जरे यांना कार चालवण्यास सांगितले. त्यानुसार रेखा  यांनी कार चालवली. जातेगाव घाट येथे आमच्या कारसमोर दोघा आरोपींनी दुचाकी आडवी घातली. कट का मारला? अशी विचारणा करत जरे यांच्याशी त्यांनी वाद घालायला सुरुवात केली.

त्याचवेळी मला एक फोन आला, मी फोनवर बोलत होते. त्यावेळी आरोपीने जरे यांना मागे ढकलले आणि वार केले. हे पाहून कारमध्ये बसलेल्या त्यांच्या आई जोरात ओरडल्या. त्यावेळी मी जरे यांच्याकडे पाहिले. तेव्हा मला धक्काच बसला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

मी सुरूवातीला १०० क्रमांकावर फोन केला, पण तो लवकर लागेना. त्यानंतर मी मॅडमला दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जरे यांना त्यांच्या मुलाने व मी कारमधील दुसऱ्या सीटवर शिफ्ट केले व मी कार चालवायला घेतली.

गाडी सुपा टोल नाक्यावर आणली. तेथे रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेत रेखा जरे यांना शिफ्ट करून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.

दरम्यान आपल्या जबाबानंतर माने यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.  या घटनेने मला मोठा मानसिक धक्का बसला आहे. माझी शुगर वाढली होती. त्यामुळे मी दोन दिवस फोन बंद ठेवले होते. माझी आईदेखील घाबरली होती.

मी फरार वगैरे झाले नाही. मी महिला व बालविकास अधिकारी आहे. मी अनेक महिलांना व बालकांना न्याय देते. पण आता या घटनेनंतर मलाच भीती वाटत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज करून मला पोलिस संरक्षण मिळावे, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

संशयित हल्लेखोरांचे छायाचित्रच ठरला धागा

राष्ट्रवादी काँग्रेसशी  संबंधित जरे या  सामाजिक कार्यकर्त्या होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीमुळे त्‍यांच्‍या हत्येमागे अनेक शक्यता व्यक्त होत होत्या. हत्या दुचाकीला कट मारल्याच्या  किरकोळ कारणावरून झाली की, पूर्वनियोजितरित्या सुपारी देऊन घडवून आणण्यात आली, या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू केला.

त्यावेळी जरे यांच्यावर हल्ला झाला तेंव्हा गाडीत त्यांचा मुलगा होता. त्यावेळी त्याने संशयित हल्लेखोरांचे कारमधून छायाचित्र काढले होते.

त्याचा वापर करत  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासाच्या दृष्टीने ते प्रसिद्ध केले. हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन, तसेच सुपे व तोफखाना पोलिस ठाण्याचे प्रत्येकी एक, तांत्रिक पथक, अशी सहा पथके विविध ठिकाणी रवाना केली हाोती.

बाळ बोठे कसा मोठा झाला?

बाळ बोठेवर सुपारीचा आरोप होण्यापूर्वी एकतर्फी प्रेमातूनही आरोप झाले होते. यानंतर त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले होते. या प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली होती. बोठे गुन्हेगारी वार्तांकन करत असल्याने त्याला  नगरमधील गुन्हेगारी जगत चांगलेच परिचयाचे होते.

त्याने अनेक प्रकरणे उघडकीस आणत अनेकांची अडचण केली. एका प्रकरणात सर्वांनाच अडचणीत आणले होते अशीही माहिती मिळते आणि त्याला तेव्हापासून ओळख मिळू लागली. बाळ बोठेच्या नावावर पुस्तकेही असून विविध विषयांत त्याने पदवी घेतली आहे. विविध पुरस्कारही त्याने मिळवले आहेत. त्याचा रुबाब आणि अनेक देशांमधील प्रवास हा डोळे दिपवणाराच ठरला आहे.

बोठेचे नाव उघडकीस

या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर मुख्य सूत्रधार हा पुण्यातील एका दैनिकाच्या नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक असल्याचे समोर आले. अधिक तपासात बाळ बोठेचे नाव उघडकीस आले.

यानंतर तो पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ राबविले. मात्र बोठे हा पोलिसांना आढळून आला नाही.

मात्र बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्यामार्फत ७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायातयात अर्ज केला होता. तर आरोपी सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके व ऋषिकेश पवार यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

जरे यांचा मुलगा रुणाल याने ही आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच त्याने बाळ बोठे त्याच्यापासून अथवा हस्तकांपासून आमच्या जीवाला धोका आहे.

आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला बोठे हाच जबाबदार राहील, असेही जरे यांचा मुलगा रुणाल याने म्हटले होते. मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

या प्रकरणाची चौकशी रेंगाळली असल्याने संशयाला वाव फुटला आहे. या प्रकरणात बाळ बोठे याला लपविण्यासाठी एखाद्या मंत्र्याने ताकद लावली असावी, असा संशयही रुणालने व्यक्‍त केला होता.

त्याचबरोबर बोठे याचा इतिहास पाहिला असता, त्याला शासकीय वरदहस्त आहे का? त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का? पोलिस यंत्रणा गोंधळलेली आहे का? काही पोलिस अधिकारी बोठेला मदत करत आहेत का? असे विविध प्रश्‍न चर्चिले जात हाोते. याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही.

अखेर मुख्य सूत्रधार बोठेच्या मुसक्या आवळल्या

गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी पोलिसांना बोठेचा ठावठिकाणा समजला होता. परंतु ज्या बिलालनगर भागात बोठे लपून बसला होता, तो भाग गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याने पोलिसांना सहजासहजी तेथपर्यंत पोहोचणे आव्‍हानात्‍मक  होते.

त्यामुळे नगरच्या पोलिसांनी सोलापूर क्राईम ब्रांच, मुंबई क्राईम ब्रांच, महाराष्ट्र पोलिस तसेच तेलंगणा व हैदराबाद पोलिसांना सोबत घेण्यात आले. त्यासाठी मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार लोकेशन काढण्यात आले.
या भागात असलेल्या प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर पोलिस गेले.

त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची पक्की खबर होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावलेले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता.

मात्र, बोठे तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत त्याला अटक केले.सकाळी ६ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रुममध्ये बोठे एकटाच होता.

बाोठे याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) ही महिला फरार आहे. दुसरीकडे नगरमध्ये राहून बोठे याला मदत करणाऱ्या महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) यालाही शनिवार सकाळी अटक करण्‍यात आली. तनपुरे हा त्याच्याशी नगरमधून संपर्कात राहत त्याला मदत करत होता.

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. फरार असताना त्याने अनेक मोबाईल वापरले. त्यातील एक मोबाईल नंबर हा २०१८ मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरलेला आहे.

बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली.

हैदराबादमध्येही गेल्या तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस येण्याच्या आधीच तो पळून गेला. बी. बी. पाटील या नावाने तो वावरत होता.

दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर जरे हत्या प्रकरणी गेल्या १०२ दिवसांपासून वॉन्टेड असलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा सापडला. याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. देशभरातील आरोपींचे आश्रयस्थान असलेल्या कुख्यात बिलालनगर भागात धडाकेबाज कारवाई करून पोलिसांनी त्याला अटक केली.

रेखा जरे खून प्रकरण – घटनाक्रम

  • ३० नोव्हेंबर २०२० : नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गळा चिरून हत्या
  • या प्रकरणात पाच आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार असलेला पुण्यातील एका दैनिकाच्या नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ  बोठे पसार
  • २ डिसेंबर २०२० : संशयित मारेकरी फिरोज राजू शेख याला श्रीरामपूरमध्ये अटक
  • दुसरा संशयित मारेकरी गुड्डू शिंदे यालाही अटक
  • खुनाची सुपारी आदित्य चोळके यांने घेतल्याचे चौकशीत निष्पन्न. चोळके याला वडझिरे येथे अटक.
  • ३ डिसेंबर २०२० : चोळके यांची चौकशीतून सुपारी सागर भिंगारदिवे याने दिल्याचे निष्पन्न.
  • सागर भिंगारदिवेला पन्हाळा येथून अटक. सागर भिंगारदिवे याच्या चौकशीतून बाळ बोठे याने जरे यांच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती पोलिस आधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • ५ डिसेंबर २०२० : बोठे याच्या बंगल्याची झडती, पिस्तूल जप्त.
  • ७ डिसेंबर २०२० : मुख्य साक्षीदार विजयमाला माने यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल
  • अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोठे याचा अर्ज
  • बाळ बोठे याच्यापासून जीवाला धोका असल्याचा जरे यांच्या मुलाचा पोलिस अधीक्षकांना अर्ज
  • ८ डिसेंबर २०२० : विजय माला माने व जरे यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण
  • १३ मार्च २०२१ :  तब्बल १०२ दिवसांपासून  बाळ बोठे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here