सावधान रहा : म्युकरमायकोसिसचे राज्यावर महासंकट, इंजेक्शनचा तुटवडा

361

राज्यातील लोकं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळत असताना नवे संकट समोर आले आहे. म्युकरमायकोसिस हे नवे संकट आहे, त्याला आपण सामूहिकपणे तोंड देऊन हा लढा देखील जिंकू या, असा आशावाद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

‘कोरोना नियंत्रणात येत असतानाच महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस या डोळ्यांच्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे.

या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आजघडीला राज्यात 850 अक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराची तीव्रता वाढण्यापूर्वीच या आजाराला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन लाख इंजेक्शन्सची निकड आहे.

सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे, पण ती इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होणार आहेत. तोपर्यंत पुढचे दहा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे व अग्निपरीक्षा पाहणारे आहेत; अशी गंभीर चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे. कमी होत चाललेली रुग्णसंख्या हा त्याचाच परिणाम आहे.

राज्यात कोरोना रुग्ण कमी होत असताना, दुसरीकडे म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीने महाराष्ट्रावर हल्ला चढवला आहे. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेची एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई सुरू आहे. सुदैवाने म्युकरमायकोसिसवर इंजेक्शन उपलब्ध आहे. पण रुग्णवाढीच्या वेगाच्या तुलनेत राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे.

इंजेक्शन बनवण्याची तयारी

‘म्युकरमायकोसिस प्रतिबंधक इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचे साराभाई कंपनीने मान्य केले आहे. तो कच्चा माल वर्धा आणि पालघर येथील उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची आपली तयारी आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला झुकते माप द्या !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला म्युकरमायकोसिस प्रतिबंधक इंजेक्शनच्या पुरवठ्यात झुकते माप द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती दिली.

पुढच्या दहा दिवसांत ही इंजेक्शने आणि आवश्यक औषधांचा पुरवठा होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार त्यासाठी केंद्राच्या संबंधित विभागाशी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here