लातूर : कोविड-19 या साथरोग आजाराने सर्व जगात थैमान घातलेले आहे.
या आजाराने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र, भारतात हजारो, लाखोच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
या वाढत्या रुग्ण संख्या मुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले असून रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.
याच पार्श्वभूमीवर मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन कारखान्याच्या परिसरात ऑक्सीजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज येथे झाले.
यावेळी माजी मंत्री तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, विजय देशमुख, रवींद्र काळे, पृथ्वीराज शिरसाठ, लक्ष्मण मोरे, संभाजी रेड्डी, जितेंद्र रनवरे, प्रवीण पाटील, कैलास पाटील, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख,सचिन दाताळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या ऑक्सीजन प्रकल्पातून 177 सिलेंडर प्रतिदिन ऑक्सिजन निर्माण केला जाणार असून या ऑक्सिजनची शुद्धता सुमारे 95 टक्के इतकी आहे.
हा निर्माण होणारा ऑक्सिजन आवश्यकतेप्रमाणे लातूर जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवठा केला जाणार आहेे.
या प्रकल्पाचे आज पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भूमी पूजन झाले असून हा प्रकल्प सुमारेे एका महिनाभराच्या कालावधीत पूर्ण होऊन यातून ऑक्सिजन निर्मितीला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 76 व्या जयंती दिनानिमित्त मांजरा कारखाना परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती स्मारकास पालकमंत्री अमित देशमुख व उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.