उदगीर : शिवलिंग शिवाचार्य महाराज व लिंगायत समाजातील सर्व मान्यवर, भक्तगण यांच्या मागणी प्रमाणे श्री हावगीस्वामी विरशैव लिंगायत भवन बांधकामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला असून आज प्रत्यक्ष या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले असून पुढील वर्षभरात हे सभागृह सर्वसामान्याच्या वापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर येथे आयोजित श्री हावगीस्वामी वीरशैव लिंगायात भवन सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेेळी श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, गट विकास अधिकारी महेश सुळे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार मनोहर पटवारी, राजेश्वर निटूरे, बसवराज पाटील नागराळकर, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह अन्य मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, येथे सभागृह बांधकामासाठी 25 लाखाचा निधी देण्याची मागणी देवस्थान समितीने केलेली होती. तरी या सभागृहच्या कामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला. या सभागृहाला जागा देण्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने मठाधीश शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी व सर्व समितीने एकमुखाने या जागेवर हे सभागृह बांधण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल देवस्थान समितीचे ही त्यांनी आभार व्यक्त केले.
सामान्यातला सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू समजून सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करत आहे. या सभागृहाची निर्मिती करण्यामागे सामाजिक बांधिलकी व समाजातील व इतर समाजातील सुद्धा लोकांना एकत्र येऊन भक्तगणांची कार्यक्रम असतील सार्वजनिक स्वरूपातील कार्यक्रम असतील सर्व आनंददायी कार्यक्रम या ठिकाणी पार पडावेत, असे आवाहन श्री. बनसोडे यांनी केले.
उदगीरच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असून सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन करून उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामे सुरू करण्यात येत असून उदगीरच्या विकासाचा बॅकलॉग लवकरच भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगून या सभागृहाचे काम असो वा इतर कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशासकीय इमारती, एमआयडिसी, लिंबोटी पाणी पुरवठा योजना, रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे व जलजीवन योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती 55 लिटर पाण्याची उपलब्धता करणे या पद्धतीने सर्वसामान्यांना लाभ मिळेल अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.
प्रारंभी राज्यमंत्री बनसोडे व परमपूज्य श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले व त्यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते श्री हावगीस्वामी वीरशैव लिंगायत भवन सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. लिंगायत भवन सभागृहाच्या कामासाठी शासनाकडून दोन कोटीचा निधी मंजूर असून या कामास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून हे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहे. तसेच या सभागृहात एक मोठा हॉल व छोटा हाल अशा पद्धतीने काम होणार असून या ठिकाणी किमान सहाशे लोकांची व्यवस्था होणार आहे.