मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली.
टास्क फोर्सच्या बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, लॉकडाऊन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत फक्त टास्क फोर्सचे सदस्य होते. या बैठकीत ऑक्सिजन कसे वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दुसरे म्हणजे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून रुग्णांना देतो.
मात्र, आता ज्या पद्धतीने या प्लॅन्टची संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा चर्चेत मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेण्यात आला.
हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांसाठी ऑक्सिजन साठवता येऊ शकते. त्यामुळे दररोजची पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वास आहे.
आपण बघतोय, अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होतेय. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
या बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे.
कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला आहे. तर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडून इंजेक्शन दिले जाईल.
त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल. हे इंजेक्शन 1400 रुपयांवर दिले जाणार नाही. काल मी याबाबत आग्रही भूमिका घेतली. रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली जावी, अशी मागणी आम्ही लावून धरली होती.
अखेर त्यानंतर आज सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्यात केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आभारी आहे.
या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील अनेक सदस्यांची भूमिका होती.
जरुर काही सदस्यांचे मत वेगळे असू शकते पण बहुतांश टास्क फोर्सचे मत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे मत होते. राज्यातील काही शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्सची उपलब्धता अडचणीत आहे.
त्यामुळे दोन-एक दिवसात अर्थ विभाग आणि अन्य विभागाची चर्चा होईल. कदाचित मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत चर्चा करतील. त्यानंतर उचित निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील.