जागतिक निविदा काढली होती परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने केंद्र सरकारने ही लस आयात करुन ती राज्यांना पुरविली पाहिजे.
देशासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असे अनेक तज्ञांचे मत आहे. राज्य सरकारने हा इशारा लक्षात घेऊन यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोरोना संक्रमण झाले तर होम आयसोलेशन पूर्ण बंद करण्यात येणार आहे. आता कोरोना झाला तर घरी राहण्याऐवजी कोविड सेंटरमध्ये रहावे लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज 18 जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात पूर्णपणे होम आयसोलेशन बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथे कोरोना रुग्ण ठेवले जातील. ते म्हणाले की, सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांच्या कुटूंबाला कोरोना संक्रमण होण्यापासून रोखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
टोपे पुढे म्हणाले की, राज्य सरकारने लसीकरणासाठी जागतिक निविदा काढली होती परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने केंद्र सरकारने ही लस आयात करुन ती राज्यांना पुरविली पाहिजे. याव्यतिरिक्त, 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसी देण्याची राज्याची जबाबदारी आहे. लस खरेदीसाठी केंद्राला राज्य सरकार पैसे देण्यासही राज्य तयार आहे, असे ते म्हणाले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार
ते पुढे म्हणाले, “आम्हाला म्युकर मायकोसिसबाबतविषयी माहिती आहे. आम्ही रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेत आहोत. राज्यात 2245 रूग्ण म्युकर मायकोसिस बाधित आहेत. आरोग्य विभागाने त्यांना एक अधिसूचित आजार घोषित केला आहे.
रुग्णालयांना शासनाला रूग्णांची माहिती पुरवणे आवश्यक व बंधनकारक आहे. या रोगासाठी आवश्यक अॅम्फोटेरिसिन औषध केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. एकदा केंद्र सरकारने औषध दिल्यानंतर आम्ही ते प्रत्येक जिल्ह्यात वितरीत करतो. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनाही या आजारावर मोफत उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी 30 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून २२०० पैकी १००७ रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत, असेही ते म्हणाले.