पुणे : राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी 29 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली. (Ajit Dada gives ‘Bumper Gift’ to Gram Panchayats)
याआधी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मुबलक निधी मिळाला आहे. पण हा निधी समाजाचा असतो. त्यामुळे या निधीचा वापर हा गावे आणि शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी झाला पाहिजे.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील गावांना देण्यात येणारे स्मार्टग्राम आणि आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार आज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) संदीप कोहीनकर आदी उपस्थित होते.
या निधीतील पैसा हा सत्कारणी लावा आणि गावे स्वयंपूर्ण बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला.
पवार पुढे म्हणाले, ‘पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसा गावाला मिळेल, याचा पालकमंत्री या नात्याने मी पालकमंत्री या नात्याने पाहत असतो. परंतु या निधीचा विनियोग गावकारभाऱ्यांनी चांगल्या कामासाठी करावा. निवडणुकीसाठी गावातील खालची-वरची आळी पालथी घालतो. पण निवडून आल्यानंतर ग्रामसेवकाला सहीसाठी सरपंच, सदस्यांना शोधावे लागते, असे होता कामा नये.
‘स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या रकमेच्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा, स्वच्छताविषयक प्रकल्पांची उभारणी करणे, महिला सक्षमीकरण, स्वच्छ पाणी पुरवठा, सौर पथदिवे बसविणे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपन घालणे आणि ग्रामस्थांसाठी इंटरनेट, वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. या समांरभात २६ गावांना स्मार्ट ग्राम तर 13 गावांना आर. आर. (आबा) पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशिष जराड यांनी केले.