नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी कधी लस घेणार हा प्रश्न विरोधक विचारत होते, त्याचे उत्तर अखेर मिळाले आहे.
या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार आहे.
या दरम्यान आमदार-खासदारांना व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) दिले जाण्याची शक्यता आहे, ज्यांचे वय जास्त आहे आणि ज्यांना काही आजार आहेत.
भारतात असे अनेक नेते आहेत ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एचडी देवगौडा या नेत्यांचा देखील समावेश आहे.
गेल्या शनिवारपासून या अभियानास सुरुवात झाली असून देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या नेतेमंडळींना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत अशी माहिती दिली की, नंतरच्या टप्प्यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेतेमंडळींचा समावेश असेल.
आरोग्यसेवा देणारे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, महानगरपालिका कर्मचारी यांच्यानंतर लसीकरण होणारी तिसरी श्रेणी 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील असेल. त्यानंतरच्या 50 वर्षांखालील लोक असण्याची शक्यता आहे.
देशातील 50 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना व्हॅक्सिन दिलं जाईल. यामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार लोकसभेत 300 पेक्षा जास्त आणि राज्यसभेत जवळपास 200 खासदारांचे वय 50 पेक्षा जास्त आहे.
सरकारने याआधीच स्पष्ट केले होते की, लसीकरणाची मोहीम विविध टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की व्हॅक्सिनेशनचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.
काय आहे प्लॅन?
अशी माहिती मिळते आहे की, प्रत्येक टप्प्यासाठी सरकारने वेगवेगळी तयारी केली आहे. अशावेळी या मोहीमेमध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीला लस टोचली जाणार नाही.