सांगली : भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी महापालिकेत आयाराम कारभार्यांना पक्षात घेऊन सत्ता मिळवली. त्यांनाच पुन्हा कारभारी बनवून सत्तेवर बसविले आहे.
देश काँग्रेसमुक्त करण्याच्या नादात भाजपच आता काँग्रेसमय झाल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते व नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी केला. नव्यांच्या नादाने जुने भाजपवालेही आता भ्रष्टाचारी झाले आहेत, असे ते म्हणाले.
बर्वे म्हणाले, या सार्यातून जनतेचा भ्रमनिरास झाला असून, यातून भाजपची रोज बदनामी होत आहे. या विरोधात दि. 31 डिसेंबररोजी आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.
भाजपने विकासाभिमूख व पारदर्शी कारभाराचे आश्वासन देत महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचे चित्र दाखविले होते. पण सत्ता येताच भाजपमध्ये नव्याने आलेल्यांचा जुनाच भ्रष्ट कारभार सुरू राहिला. यातून भूखंड घोटाळे, गैरकारभार सुरूच आहे. आता जुन्या सत्ताधीशांच्या संगतीत जुने भाजपवालेही पूर्ण बिघडले आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांच्या नादी लागून कारभारीही भ्रष्ट झाले आहेत. – वि. द. बर्वे
ते म्हणाले, स्व. दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलबिहारी वाजपेयी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला भाजप भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला आहे.
त्यामुळे रोज पक्षावर आरोप होत आहेत. त्याची खंत पक्षश्रेष्ठींना नाही. भाजप सुधारण्याची शक्यता नाही. तरीही या पक्षाच्या नेत्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी दि. 31 डिसेंबरला राममंदिराबाहेर एक दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.