दिल्लीतील भाजपा नेत्यांनीच फडणवीसांचे ‘गर्वहरण’ केले!

202

भाजपमधील देवेंद्र फडणवीस समर्थकांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करत आहे. सत्ता हातातून गेल्याने त्यांची आदळआपट सुरू आहे. त्यामुळेच दर्जाहीन राजकारण करत आहेत, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली.

राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोविडसारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम काम केले. राज्यात जी आरोग्य व्यवस्था उभारली गेली आणि कोविडवर नियंत्रण मिळवले गेले. त्याची दखल जगाने घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाचे कौतुक केले आहे. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी ठाकरे सरकारने त्यातून मार्ग काढत राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. लवकरच महाराष्ट्र पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले.प्रत्यक्षात दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते.

दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचे ‘गर्वहरण’ करून काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात ‘आम्ही’ हा शब्द असतो. परंतु देवेन्द्र फडणवीस यांनी थेट ‘मी’ पणाची भाषा सुरू केली होती. त्यांना केंद्रीय नेतृत्त्वाचे स्वप्न पडू लागले होते. हे दिल्लीतील नेत्यांना रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांचा ‘काटा’ काढला, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे नेहमीच पडतात

नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, नारायण राणे नेहमीच अशी भविष्यवाणी करत असतात, गेले कित्येक वर्षं आम्ही ऐकतोय.
सरकार पडेल असे ते नेहमीच बोलत असतात.

मात्र सरकार पडत नाही. परंतु नारायण राणे नेहमीच पडत असतात. त्यामुळे त्यांच्या या बकवासगिरीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here