भोपाळ : भाजप नेते राम मंदिराच्या नावाने निधी गोळा करतात आणि संध्याकाळी त्या पैशातून दारू ढोसतात, असं वादग्रस्त विधान कांतिलाल भूरिया यांनी केलं असून त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिरावरून वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत असून त्यासाठी संपूर्ण देशातून विश्व हिंदू परिषद आणि भाजपने निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही संघटनांनी हे राष्ट्रव्यापी अभियान हाती घेतलं आहे.
लोकांकडून स्वेच्छेने वर्गणी घेतली जात आहे. त्यातच कांतिलाल भूरिया यांनी वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भूरिया यांच्या या विधानावर मध्यप्रदेशातून संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यप्रदेशातील पेटलावद येथे एका धरणे आंदोलनादरम्यान कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त विधान केलं. भूरिया हे दोनदा केंद्रीय मंत्री, 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत.
काँग्रेसकडून निधी जमा
मध्यप्रदेशात काँग्रेसेनेही राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनीही मध्यप्रदेशात निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर पूर्ण होणं म्हणजे राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होण्यासारखच आहे, असं शर्मा म्हणाले होते.
कमलनाथ, दिग्विजय सिंह काय म्हणाले?
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही राम मंदिर निर्मितीचं स्वागत केलं होतं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाही अयोध्येत राम मंदिर व्हावं असं वाटत होतं, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली होती.