मुंबई : राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरात निधी संकलन अभियान राबवलं जात आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
श्री रामाच्या नावाखाली भाजपकडून टोल वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप, नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या आरोपानंतर विरोधकांनी विधानसभेत एकच गदारोळ उडाला.
‘काही दिवसांपूर्वी मला एक माणूस भेटला तो म्हणाला की, ‘अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरासाठी महाराष्ट्रातूनही निधी गोळा करत आहेत आणि त्या साठी लोकांना त्रास देत आहेत.
राम मंदिराच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘राम मंदिरासाठी टोल वसुली केली जातेय. भाजपला हा अधिकार कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला आहे. तसंच, भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी गोळा करण्याचा ठेका भाजपला कोणी दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली देगणी जमा करत आहेत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुम्ही हिंदू असताना त्यांना उत्तर का दिलं नाही? असा प्रश्नही आपण त्या व्यक्तीला केला. त्यावर तो मला म्हणाला ३० वर्षापूर्वी मी दिलेल्या पैशांचा हिशोब मागिता तर ते बोलले आम्ही तुला हिंदू धर्मातून बाहेर काढू,’ असं पटोले म्हणाले. ‘म्हणून सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.
‘राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या चॅरिटी ट्रस्टकडून घेतला जात आहे तसेच राम मंदिरासाठी 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा,’ असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘सभागृहात नाना पटोले राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला असून. जे लोकं खंडणी गोळा करतात, त्यांना समर्पण काय समजणार,’ असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
नाना पटोले यांच्या आरोपांनंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपांवर आक्षेप घेत घोषणाबाजी सुरु केली तसंच, जय श्री रामचा नाराही यावेळी देण्यात आला. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.