सांगली महापालिकेत भाजपचा पराभव : यापुढे भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नाहीत : राष्ट्रवादी

195
Digvijay Surywanshi

मुंबई : पूणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते आणि त्याच्यावर सांगली महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

तसेच, यापुढे भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नाहीत,असे भाकितही त्यांनी केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का दिल्यानंतर आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वर्चस्व राखल्यानंतर महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला सांगली महापालिकेत मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखून आघाडीनं सांगली महापालिकेत सत्तांतर घडवून आणलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीचे नवे महापौर म्हणून निवडले गेले आहेत.

महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले.

महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली. सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता होती.

महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्यानं पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक होणार होती. या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आधीपासूनच आखली होती.

त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्यानं चुरस वाढली होती. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली.

त्यात दिग्विजय यांनी धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

भाजपचे पाच नगरसेवक फुटले!

महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती.

सत्ता राखायचीच यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना त्यात यश आलं नाही. मागासवर्गीय समिती सभापती स्नेहल सावंत यांच्यासह महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम सहयोगी सदस्य विजय घाटगे यांनी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. दोन नगरसेवक मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सुकर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here