2020 हे वर्ष कोरोनाच्या सावटाखालीच निघून गेले. जीवघेण्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण घरातच होते.
या वर्षात बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले. कारण यंदा दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी जगातून अनपेक्षित एक्झिट घेतली.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनं सर्वत्र खळबळ माजली आणि त्यानंतर, इरफान खान, ऋषी कपूर, सरोज खान, वाजिद खान, एसपी बालासुब्राह्मण्यम, निशिकांत कामत व इतर दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.
ऋषी कपूर – अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील दुसरी दु:खद बातमी समोर आली, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच निधन.
दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराशी लढणा-या ऋषी कपूर यांच 30 एप्रिल रोजी सकाळी 8.45 वा निधन झालं ते 67 वर्षांचे होते. ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. अलिकडे आलेल्या अग्निपथ, मुल्क, कपूर एन्ड सन्स सारख्या चित्रपटात देखील त्यांनी दमदार भूमिका साखारल्या होत्या.
सुशांत सिंग राजपूत – टीव्ही सिरिअलमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतचं अचानक सोडून जाणं सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता.
14 जूनला सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन मृत झाल्याचे आढळून आले. हि आत्महत्या नसून खून आहे व त्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली.
बॉलीवूड मधील नेपोटीझमच्या चर्चेला उधाण, त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यातून ड्रग्ज प्रकरण समोर आले आणि त्याच्या चौकशी अजूनही सुरूच आहेत.
सुशांत एक गुणी आणि हरहुन्नरी कलाकार होता. ‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘केदारनाथ’, ‘पीके’ ‘छिछोरे’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केलं. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील सुशांतची भूमिका फार गाजली.
दिग्दर्शक निशिकांत कामत – प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता मराठमोळे निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते.
31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, निशिकांत यांची मृत्यूशी झूंज अखेर संपली आणि वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निशिकांत कामत यांनी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत ‘दृष्यम’, इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’, जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि रॉकी हँडसम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.
मराठी चित्रपटांमध्ये ‘डोंबिवली फास्ट’ व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन ‘लय भारी’, ‘फुगे’ या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
‘सातच्या आत घरात’ हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता. हिंदी चित्रपटांमध्ये विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘भावेश जोशी’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांतही निशिकांत कामत यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या.