मुंबई- महाराष्ट्राची हास्य जत्रा असो की ‘कबीर सिंग’मधली पुष्पा, वनिता खरात हिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
कबीर सिंग सिनेमात हातातून काचेचं ग्लास तुटल्यावर शाहिद कपूर मोलकरणीच्या मागे रागात धावात जातो. हा सीन संपूर्ण सिनेमात प्रचंड गाजला होता. वनिताने सिनेमात मोलकरणीची भूमिका साकारली होती.
सध्या वनिता तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. २०२१ च्या एका कॅलेन्डरसाठी तिने सकारात्मक संदेश देणारं एक बोल्ड फोटोशूट केलं. यात ती आपल्या शरीराचा तिला अभिमान असल्याचं सांगते.
यासोबतच शरीराचा आकार किंवा रंग याचा फारसा परिणाम तिच्यावर होत नसल्याचंही सांगितलं. सध्या तिच्या याच फोटोशूटचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे वनिताने हे फोटोशूट करण्याआधी आपल्या आई- बाबांना याची कोणतीच कल्पना दिली नव्हती. जेव्हा वनिताच्या आई- बाबांनी हे फोटोशूट पाहिलं तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा अभिमानच वाटला.
वनिता खरात ही सिने आणि नाट्यअभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून तिला महाराष्ट्रात ओळख मिळाली. तर ‘कबीर सिंग’ हा तिचा पहिला बॉलिवूडपट आहे.
वनिता एक उत्कृष्ट कॉमेडियन आहे. तिने अनेक मराठी रिअॅलिटी कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. वनिताचा जन्म मुंबईत झाला असून तिचं संपूर्ण शिक्षण आणि करिअर मुंबईमधलंच आहे.
वनिताने का केलं फोटोशूट?
ईटाइम्सशी बोलताना वनिता म्हणाली की, ‘ही अभिजीत पानसे यांची संकल्पना होती. मी त्यांना आधीपासूनच ओळखत होते. आपण सारेच सुंदर दिसतो अशी या कॅलेन्डरची संकल्पना आहे.
कोणत्याही मुलीला किंवा स्त्रीला तिचं वजन जास्त असल्याची लाज वाटू नये. या फोटोशूटद्वारे आपल्या शरीराविषयी सकारात्मक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी, गोरं होणं किंवा सडपातळ असण्याची आवश्यकता नाही.
फोटो पाहिल्यानंतर आई- वडिलांची प्रतिक्रिया काय होती?
वनिता म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर मी आई- वडिलांना याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. सर्व काम पूर्ण झाल्यावर मी त्यांना सांगितले आणि माझा फोटो दाखवला. त्यांनीही या सर्व गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या.
त्यांना माहीत आहे की हे माझे काम आहे आणि ते देखील म्हणाले की ते आपल्या कामाचा एक भाग आहे. उलट त्यांनीच मला सांगितलं की फोटो खूप सुंदर आला असून त्यात वाईट असं काहीच नाही.’