डोंबिवली : कल्याणमधील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पीडिता गर्भवती राहिल्याने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. रमेश कुमार (वय २०) असे कथित प्रियकराचे नाव आहे.
त्याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी दिलेली माहिती अशी की, कल्याण पूर्वेतील मलंगरोडला नांदिवली परिसरात पीडित मुलगी आणि याच परिसरात आरोपी रमेश राहतो.
यामुळे दोघांची ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत रमेशने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर लग्नाचे आमिष दाखवून ऑक्टोबर महिन्यात राहत्या घरातच तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीच्या अत्याचारामुळे पीडिता गभर्वती राहिली. मात्र याबद्दल तिने घरच्यांना सांगितले नव्हते. यानंतर तिच्या पोटात दुखत असल्याने घरच्यांनी तिला कल्याण पश्चिम परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा प्रकार समोर आला. तेव्हा तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. घरच्यांनी पीडितेला घेऊन कोसळेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यानंतर तिच्यावरील झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी रमेशवर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी करत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून कोसळेवाडी पोलिसांनी रमेशवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.