BREAKING NEWS | पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळले, मुख्यमंत्री नारायणसामींचा राजीनामा

182
CM Narayan Swami

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीत काँग्रेस – डीएमके आघाडीचं सरकार कोसळलंय. विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले आहे. (Chief Minister Narayanasamy resigns)

यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी (CM Narayanasamy) यांनी आपला राजीनामा नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे. विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी बहुमताचा केलेला दावा फोल ठरला.

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ‘वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, येत्या काही महिन्यांत (एप्रिल-मेमध्ये) पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसोबतच पुदुच्चेरीमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळले .

विधासभेत मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक झाले. त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळातील आव्हानं सदनात मांडली.

सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं सहकारी कृषी कर्ज माफ केलं. छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदी ६ हजार रुपये देत होते तर आम्ही ३७,५०० रुपये शेतकऱ्यांना दिले, असं नारायणसामी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आम्हाला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहिलो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

  • माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज पुदुच्चेरीला आल्या होत्या तेव्हा त्यांनी पुदुच्चेरीला केंद्रशासित राज्याऐवजी पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा असे म्हटले होते. राज्यात जनतेने निवडून दिलेलं सरकार असायला हवे, असंही नारायणसामी यांनी विधानसभेत म्हटले.

डीएमके आणि अपक्ष आमदारांच्या समर्थनानं सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर आम्ही अनेक पोटनिवडणुकांचा सामना केला. आम्ही उपनिवडणुकाही जिंकल्या. हे स्पष्टच आहे की पुदुच्चेरीच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.

तामिळनाडूमध्ये आम्ही तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांचा वापर करतो, मात्र भाजपकडून जबरदस्तीनं हिंदी भाषा थोपवण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांनी म्हटले.

पुदुच्चेरी विधानसभा

उल्लेखनीय म्हणजे, पुदुच्चेरी विधानसभेत एकूण ३३ जागा आहेत. यातील ३० सदस्य आमदार म्हणून निवडून येतात तर तीन सदस्यांची नेमणूक केंद्र सरकारकडून करण्यात येते.

काँग्रेस सरकारने २०१६ साली निवडणुकीत १५ जागांवर विजय मिळवला होता. डीएमकेच्या तीन आमदारांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले होते.

यातील डीएमकेच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारानं रविवारी राजीनामा दिला. त्यानंतर नारायणसामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याचा दबाव वाढला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here