लग्नाच्या दिवशीच नवऱ्याने मांडवातून प्रेयसीसोबत पोबारा केला. त्यामुळे धाडसी तरुणीने पुढाकार घेत लग्नासाठी आलेल्या एका वऱ्हाड्याशी लग्नगाठ बांधली.
कुटुंबावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगातून मुलीने मार्ग काढल्याचे समाधान असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने प्रेयसीसोबत पोबारा केल्याने दोन्ही कुटुंबांना धक्का बसल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटकात चिकमंगलुरू जिल्ह्यातील तरिकेरे तालुक्यात ही घटना घडली आहे. अशोक आणि नवीन या दोन्ही भावांचे लग्न एकाच दिवशी होणार होते.
नवीन आणि अशोकने लग्नापूर्वी होणारे सर्व विधी पूर्ण केले. नवीनने होणारी पत्नी सिंधू हिच्यासोबत लग्नाचे अनुष्ठानही पूर्ण केले. फक्त लग्नघटिकेची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो.
त्याचवेळी नवीन लग्न मंडपातून अचानक गायब झाल्याचे समजले. नवीन नेमका कुठे गेला, याचा तपास केला असता, तो त्याच्या प्रेयसीसोबत लग्न मंडपातूनच पळून गेल्याचे समजले.
त्याच्या प्रेयसीने आपल्यासोबत आला नाहीस, तर तुझे लग्न मोडून समारंभातच सर्वासमोर विष घेत आत्महत्या करण्याची धमकी नवीनला दिली होती.
या धमकीने घाबरून नवीनने लग्न मंडपातूनच प्रेयसीसोबत पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिंधुसमोर मोठे संकट उभे ठाकले. तसेच दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला.
अशोकचे लग्न लागल्यावर सिंधूने विचार करून मोठा निर्णय घेतला. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांमधील सुयोग्य वर शोधून त्याच्याशी लग्न करण्याचे तिने ठरवले.
लग्न मंडपातच तिने वराचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे लग्नासाठी आलेला चंद्रप्पा नावाचा तरुण तिला लग्नासाठी योग्य वाटला. तो बीएमटीसीमध्ये कंडक्टर आहे.
त्यानेही सिंधूशी लग्न करण्यास संमती दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने त्याच लग्नमंडपात त्याच दिवशी सिंधूचे चंद्रप्पाशी लग्न लावण्यात आले.
नवरदेव पळून गेला आणि कुटुंब धास्तावलेले असताना मुलीने पुढाकार घेऊन या संकटातून मार्ग काढत लग्न लावून घेतले याची सर्वत्र कौतुक व चर्चा होत आहे.