केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला.
हा अर्थसंकल्प म्हणजे फुगा असून टाचणी लागली की तो फुगा फुटणार आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
कोरोना काळात जाहीर केलेले दहा लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले हे जसे कोणालाच कळले नाही तसेच या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रकमा कुठे गेल्या हेही कोणालाच कळणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी आहे असे वाटत नसून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी आहे यात शंका नाही असा थेट हल्ला जयंत पाटील यांनी सरकारवर केला.
मात्र या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल व मध्यमवर्गीय यांच्यासाठी ठोस असे काहीही नाही. उलट कोरोना काळात देशाच्या सर्वात वाईट काळातील, सर्वात वाईट अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह बोलताना केली.
महाराष्ट्रासाठी देखील या अर्थसंकल्पात काहीच नाही. नागपूर नाशिक व पुण्याच्या मेट्रो साठी केलेली तरतूद नाममात्र आहे.
या अर्थसंकल्पात संरक्षणावर किती मदत देणार हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले नाही कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखी आकडेवारी नसणार असा टोला लगावतानाच सरकार संरक्षण तरतुदीवर बोलत नाही याचा अर्थ सरकार सुरक्षितेबाबत गंभीर नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
याउलट पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आल्याने तिथे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी भरपूर पैसे देण्यात आलेले आहेत.
आमच्याही राज्यात रस्ते खराब आहेत. भारत सरकारचा पैसा वापरून भाजपाला पश्चिम बंगाल मधील निवडणूका जिंकायच्या आहेत असे दिसते असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
‘आपलं आहे… सरकारी आहे’ त्याला मदत करण्याऐवजी कॉर्पोरेट क्षेत्राला 1 लाख 45 हजार कोटीची मदत मोदी सरकारने दिली आहे. करांच्या पद्धतीत देखील कोणतेही आमूलाग्र बदल करण्यात आलेले नाहीत असेही जयंत पाटील म्हणाले.
बोलायचं एक आणि करायचं एक अशी पद्धत हे सरकार अवलंबत आहे. मोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच नाही अशी पद्धत भाजपची आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.