अर्थसंकल्प म्हणजे देशाची संपत्ती विकण्याची योजना | राहुल गांधी

211

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. 

या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, या बजेटकडून निराशा झाल्याची टीका शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.

आपली मालमत्ता भांडवलशाही मित्रांच्या हाती देण्याची योजना : राहुल गांधी

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लोकांच्या हातात रोख रक्कम पैसे राहतील ही गोष्ट आता विसरा. मोदी सरकारने आपली मालमत्ता आपल्या उन्मत्त भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची योजना आखली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

सर्वपक्षीय खासदारांनी राज्यावरील अन्याय दूर करावा :  उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही.

प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे.

महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

बजेटमध्ये महाराष्ट्र शोधतोय : संजय राऊत

अर्थसंकल्पाचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना बजेटमध्ये राज्याला काहीही मिळाले नसल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय. अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय.

बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये राज्यासाठी काहीही विशेष तरतूद नाही. राज्याची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत.

आकडे येत असतात ते किती खरे हे 6 महिन्यांनी समजते. आर्थिक थापा बंद करायला हव्यात. नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही.

यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय? जमीन केंद्राची आहे म्हणतात. पण, कुठून मंगळावरून जमीन आणलीय का? असे सवाल राऊत यांनी केंद्राला विचारले आहे.

देशाची संपत्ती विकण्यासाठी बजेट : भाई जगताप

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. “जीडीपीमध्ये 37 महिन्यांमधील घसरण आहे याचा उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात झाला नाही.

1991 नंतर हे सर्वात मोठं संकट आहे. देशाची मौल्यवान संपत्ती विकण्याशिवाय बजेटमध्ये कोणत्याही मुख्य मुद्द्यावर लक्ष दिलेलं नाही. अर्थव्यवस्थेला पुढे नेऊ नका, केवळ देशाची मौल्यवान संपत्ती विका हाच मुख्य मुद्दा आहे.

सहा स्तंभांवर आधारित अर्थसंकल्प – अशोक चव्हाण

आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आणि मोदी सरकारची एकंदर आर्थिक धोरणे खालील सहा स्तंभांवर आधारित आहेत, असं मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
१) निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास
२) शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक
३) विधानसभा निवडणूक केंद्रीत निवडक विकास
४) मनुष्यबळाचे खच्चीकरण
५) अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती
६) कमाल आश्वासने किमान कामगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here