सध्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरु आहेत. त्यानंतर आगामी काळात नगर पंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत यश मिळविण्याच्या निर्धाराने लातूर जिल्ह्यात मजबूत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करावी.
आपसातील मतभेद मिटवून टाकावेत, असे अवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. लातूर येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध प्रश्नांवर आंदोलन उभारले पाहिजे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मजबूत संघटनात्मक बांधणी करा, शिवसेनेचा पुढील मेळावा हा औसा आणि निलंगा येथे घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या दोन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला पाहिजे यासाठी परिश्रम करा. शिवसेना राज्यात महाविकास आघाडीसोबत आहे.
त्यामुळे जर कोणी भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जुन्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना सन्मान द्या, लोकांचे प्रश्न सोडवा, गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करा, शिवसेनेची सदस्यता नोंदणी करा.
ज्या गावात शिवसेनेचा सरपंच होईल त्या गावात निधी उपलब्ध करून देण्याचे मी वचन देतो असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. लवकरच शिवसेनेचा लातूर शहरात महिला मेळावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने कामे केली पाहिजेत. ८० टक्के समाजकारण व 20 राजकारण हेचं सेनेचे उद्दिष्ट आहे, त्यानुसार काम करा.
समाजासाठी काम करा, तरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिल्ह्यात वाढेल, असे प्रतिपादन संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी केले. शिवसैनिकांनी निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढवली पाहिजे.
लातूर जिल्ह्यात शिवसेनेची मिसाईल म्हणून माजी जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांचा उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. लोकांना भेटा, त्यांच्या अडचणी सोडवा असेही त्यांनी सांगितले. माजी जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुनिता चाळक यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक डॉ.शोभा बेंजरगे, सुनिता चाळक, पप्पूभाई कुलकर्णी, युवासेनेचे जिल्हाविस्तारक प्रा.सुरज दामरे, जिल्हा युवाअधिकारी अॅड.राहूल मातोळकर, कुलदीप सूर्यवंशी, लातूरचे तालूकाप्रमुख रमेश पाटील, सतीश शिंदे, बालाजी रेड्डी, गोपाळ माने, गुणवंत पाटील, विष्णूपंत साठे, रमेश माळी, शिवाजी माने, जयश्री उटगे, नगरसेवक स्वामी, सुनिल बसपुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.