राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलैअखेर घेऊन, 15 ऑगस्टपर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बीए, बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये, असे दोन प्रवाह आहेत.
त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनता आपलीच आहे. त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नातून कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत.
लवकरच स्वतःच्या जागेत हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.