अहमदाबादचं राहू द्या. तुमची जिथं सत्ता आहे तिथली नावं बदला, चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर
मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन सध्या राजकीय पक्षांत जुंपली आहे.
औरंगाबाद महापालिकेची सत्ता द्या, दुसऱ्या दिवशी संभाजीनगर करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावर आधी अहमदाबाचं कर्णावती करा, असा निशाणा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी साधला होता.
आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबाद पण बदला, माझी काहीच हरकत नाही.
औरंगाबादचं नाव बदलायचं नाही म्हणजे तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे का?, असा जळजळीत सवाल चंद्रकांत पाटील यांनी मिटकरी यांना केला आहे.
अहमदाबादच्या नामांतरावरुन मिटकरींनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीय.
परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मिटकरी यांना दिला आहे.
यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही.
महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते असा सामना रंगला आहे.
पुण्यात पत्रकार परिषद घेत औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर करु, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पाटलांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
यामध्ये अमोल मिटकरी यांनी पाटलांचा खरपूस समाचार घेतला.
अहमदाबादचं नाव कर्णावती करा- मिटकरी
गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?
एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.
औरंगाबादची सत्ता द्या : चंद्रकांत पाटील
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मागे का घेण्यात आला?
असा सवाल करत महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
औरगांबादच्या नामकरणाचा विषय राजकारणाचा नाही.
नामकरणाची कायदेशीर प्रक्रिया नव्यानं करावी लागणार आहे, असं ते म्हणाले.
सरकार चालविण्यासाठी शिवसेनेला जशी काँग्रेसची गरज आहे.
तशी कॉग्रेसलाही शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे सामंजस्याने तोडगा काढावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
पुण्याचं नाव बदलण्याबद्दल पत्रकांरांनी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा असतो, अशी प्रतिक्रिया दिली.