कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराच्या जोरात सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.
ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्र लिहिले आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, द्रमुकचे एमके स्टालिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बिजू जनता दल नेते नवीन पटनाईक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि दीपंकर भट्टाचार्य ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलं आहे.
राज्यपालाच्या आडून अडवणूक केली जातेय
ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया (दुरुस्ती) विधेयकाचाही उल्लेख केला. हे विधेयक युनियन सिस्टमच्या विरोधात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.
भाजप फक्त दिल्लीबद्दल हि कृती करीत नाही तर देशभर हेच घडत आहे. राज्यपालांच्या माध्यमातून गैर-भाजपा शासित राज्यांमध्ये समस्या निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग असे नाव ठेवल्याबद्दलही त्यांनी टीका केली.
विधानसभेनंतर एकत्र येवू
भाजप सरकारने विरोधकांच्या विरोधात सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय संस्था वापरण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळेच ईडीने केवळ टीएमसीच्याच नव्हे तर द्रमुकसह अन्य पक्षांच्या नेत्यांच्या घरावर छापा टाकला आहे. सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. विधानसभा निवडणुकांनंतर या संदर्भात ठोस योजना आखण्याची गरज असल्याचे ममता दीदी म्हणाल्या आहेत.