मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोडयांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
कोविडच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
राज्यात कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशीदेखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
संजय राठोडांचं शक्तीप्रदर्शन
दरम्यान, राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतलं. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती.
समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडावला. राठोडांचे हजारो समर्थक मंदिर परिसरात दाखल झाले होते. पोलिसांना न जुमानता समर्थकांनी मोठी गर्दी केली.
जिल्हा प्रशासनानं फक्त 50 जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती. मात्र हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक पोहरादेवी गडावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री भडकले !
गेल्या वर्षभर आपण अतिशय संयमाने आणि निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले.
या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती. आता मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे, आपली जबाबदारी आहे.
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितले होते.
कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.]
कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.
तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.