CM Uddhav Thackeray Meeting With Task Force : राज्यात 2 आठवड्याचा कडक लॉकडाऊन निश्चित | टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

436
Lockdown-in-pune

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मुंबईः राज्यात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) टास्क फोर्सची बैठक (task force meeting) घेतली आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली गेली.

कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय. लसीकरण आणि लॉकडाऊनवर बैठकीत चर्चा झाली आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश होता. जवळपास पावणेदोन तास ही बैठक चालली.

14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली.

यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात यावा असे मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडले. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे मत मांडले.

त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे

बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली.

आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळणार?

लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचे मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

14 दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here