राज्यातील महाविद्यालये करोना महामारी काळात ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. मात्र आता करोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने शाळेपाठोपाठ आता महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतयांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरुंशी चर्चा झाली आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे.
त्यांनी महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी असणार आहे.
दरम्यान, करोना महामारी पार्श्वभूमीवर तूर्त तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात आली आहे.
सध्या केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असली तरी ५ मार्चनंतर १०० टक्के सुरू करण्याचा विचार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
जे विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये गावी गेले आहेत, घरापासून दूर आहेत, त्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना महाविद्यालयात येण्याची सक्ती महाविद्यालयांनी करू नये.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन असे दोन्ही पर्याय खुले ठेवावेत, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.
वसतिगृहे सध्या बंदच
महाविद्यालये सुरू होणार असली तरी वसतिगृहे मात्र सध्या बंदच राहणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील वसतिगृहे की करोना संशयित रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत.
त्यामुळे त्या वसतिगृहांना कोणत्याही प्रकारे धक्का लावता येणार नाही. म्हणूनच तूर्त वसतिगृहे बंद राहतील अशी माहिती सामंत यांनी दिली.