अहमदपूरच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम | कोविड रुग्ण आणि नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय केली!

315
Ahmdpur photo

लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण शहरात उपचारासाठी आल्यानंतर हॉटेल बंद असल्याने त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची मोठी तारांबळ होत होती.

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची अडचण दूर करण्यासाठी व कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी पाच तरुण एकत्र आले.

कोरोना रुग्ण व नातेवाईकांना वेळेवर जेवण देण्याची व्यवस्था करावी म्हणून अहमदपूर येथील पाच तरुणांनी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा डबा देण्याचा ठरविले.

दरम्यान दररोज 150 ते 200 डबे तर गेल्या महिन्याभरापासून तीन हजार डबे या तरुण अन्नदूतांनी गरजूपर्यंत पोहचवले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा खेड्या-पाड्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे उपचारासाठी शहरात येतात.

मात्र शहरात उपचार तर मिळत होते, मात्र कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची दोन वेळेच्या जेवणाची मोठी गैरसोय होत होती.

तेव्हा ही गैरसोय दूर करण्यासाठी अहमदपूर येथील विलास शेटे, शंकर मुळे, नयुम शेख, गोपीनाथ जायभाये आणि माधव भदाडे या पाच तरुणांनी पुढाकार घेतला.

कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांसाठी दोन वेळच्या जेवणाचा डबा देण्याचे या तरुणांनी ठरविले. त्यासाठी कोणाच्या मदतीची वाट न पाहता पदरमोड करून मदत करण्याचे निश्चित केले.

या पाचही जणांनी आपली जमापुंजी या कामात वापरली आणि काही रक्कम जमा केली. त्यानंतर कोविड रुग्णांसाठी जेवणाचे डबे बनविण्यास सुरुवात केली. वरण, भात, भाजी, तीन चपाती, खीर, सलाद आणि शेंगदाने अशा पद्धतीचे जेवण या डब्यात असते.

26 एप्रिलपासून अहमदपूर शहरातील चार कोविड हॉस्पिटल, शासकीय ग्रामीण रुग्णालय, रस्त्यावरील मनोरुग्ण तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी रोज 150 ते 200 डबे पोहचवली आहेत. या तरुणांनी आजपर्यंत तीन हजार डबे आजवर पुरविले आहेत.

एकीकडे लॉकडाऊनमध्ये जेवण कसे आणायचे हा मोठा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांपुढे होता, मात्र या पाच तरुणांनी जेवणाची मोठी अडचण सोडविल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक या तरुणांचे आभार मानत आहेत.

या तरुणांनी सुरुवातीचे काही दिवस स्वखर्चातून जेवणाच्या डब्यांचे नियोजन केले. त्यासाठी दररोज जवळपास10 हजारांचा खर्च येत होता. मात्र या तरुणांची सामाजिक बांधिलकी पाहून इतरही दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

त्यामुळे तरुणावरील आर्थिक भार कमी झाला असला तरी रुग्ण आणि नातेवाईकांसाठी ते स्वतःहुन पुढाकार घेऊन डबे पोहचवतात. त्यामुळे या तरुणांचा आदर्श हा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here