जयपूर : माणूस अन्याय झाला तर पोलिसाकडे मदत मागायला जातो, जर पोलीस अन्याय करू लागले. तर सर्वसामान्यांनी त्यांच्या सुरक्षेची अपेक्षा तरी कुणाकडे करायची? राजस्थानमधील अलवर येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली.
अलवर जिल्ह्यातील खेडली पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेवरच पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. महिलेला त्याने पोलीस ठाण्यामागील एका खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले, असा त्याच्यावर आरोप आहे.
तक्रारीनुसार, २६ वर्षीय महिलेवर ५४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने सलग तीन दिवस बलात्कार केला. महिलेने बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
२ मार्च रोजी पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. पती तिला घटस्फोट देणार होता. पण तिला घटस्फोट नको होता. ती तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली. त्याच्याविरोधात काही कारवाई होईल अशी तिची अपेक्षा होती.
महिलेच्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने पतीसोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. तिला पोलीस ठाण्याच्या मागील आपल्या खोलीत नेले.
तिथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपी पोलिसाने तिच्या पतीविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. महिलेला ७ मार्च रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी तिने सिंह याला विरोध केला.
दुपारनंतर पीडितेने खेडली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी भरत सिंह याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
प्राथमिक तपासात पोलीस उपनिरीक्षक सिंह हा दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान अलवर पोलीस विभाग महिलांवरील अत्याचार आणि कामात हलगर्जीपणाच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत असते.
यावेळी तक्रारदार महिलेवरच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच तिच्यावर अत्याचार केले. पाच दिवसांपूर्वी विहार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या विरोधातही एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.