नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. यावेळी कृषी कायद्यांची बाजू मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सुरु होता.
तेव्हा संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी भर लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. देशातील सर्वात जुन्या पक्षाची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. या पक्षाचे खासदार राज्यसभेत एक भूमिका घेतात आणि लोकसभेत दुसरीच भूमिका घेतात.
राज्यसभेतील खासदार चर्चा आणि वादविवाद करतात. पण काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची भूमिका याच्या अगदी उलट असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
कृषी कायदे बंधनकारक नाहीत
कृषी कायदे हे कोणावरही बंधनकारक नाहीत. ती केवळ एक नवी व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था स्वीकारायची की नाही, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे.
अन्यथा तुम्ही जुन्या व्यवस्थेत कायम राहू शकता. सरकारला बाजार समित्याही कायम ठेवायच्या आहेत. त्यामुळेच अर्थसंकल्पात बाजार समित्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशात सामंतशाही आहे का?- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना काँग्रेसचे खासदार सातत्याने, तुम्हाला कृषी कायदे कोणी आणायलाच सांगितले नव्हते, असे बोलत होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
देशात एखादा कायदा आणण्यासाठी नागरिकांनी याचना करण्याची वाट पाहायला, आपल्या देशात काय सामंतशाही आहे का? लोकशाही व्यवस्थेमध्ये असे चालत नाही. लोकशाहीत सरकारने संवेदनशील राहून जबाबदारी घेतली पाहिजे.
तिहेरी तलाक, आयुषमान योजना, स्वच्छ भारत योजना किंवा मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, हे कोणी सांगितले म्हणून सरकारने केले नाही. तर नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने स्वत:हून हे निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.