सोशल मीडियाचा सामान्य माणसाच्या जीवनात शिरकाव झाल्यापासून राजकीय प्रचाराची दिशा बदलून गेली आहे.
२०१४ पासून राजकीय प्रचाराचं तंत्र बदलंल असून, आता राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
राजकीय आखाड्यातील सोशल वॉरसाठी राजकीय पक्षांचे स्वतंत्र सेलच तयार झालेले असून, सत्ताधारी भाजपाच्या ‘आयटी सेल’ला काँग्रेस ‘सोशल मीडिया वॉरिअर्स’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे.
तब्बल पाच लाख वॉरिअर्सची काँग्रेसकडून भरती केली जाणार आहे.
इंडिया टुडे वृत्तवाहिनीने याविषयीचं वृत्त दिलं आहे. सोशल मीडिया पेजचं काम करण्यासाठी काँग्रेसकडून लवकरच पाच सदस्यांची भरती केली जाणार असून, त्याविषयी सोमवारी हेल्पलाईनची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
२०१४ पासून काँग्रेसला निवडणुकीत सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे.
त्यामुळे काँग्रेसकडून याचं आत्मचिंतन केलं जात असून, राजकीय प्रचारात सोशल मीडियाचा महत्त्वाची भूमिका असल्यानं काँग्रेसकडून हे पाऊल टाकण्यात येणार आहे.
काँग्रेसकडून पाच लाख सोशल मीडिया वॉरिअर्सची भरती केली जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ५० हजार पदाधिकाऱ्यांचा निवड पक्षाकडून केली जाणार आहे. ज्यांच्या मदतीसाठी साडेचार लाख कार्यकर्ते असणार आहे.
सोशल मीडियाला समर्पित वेब पेजेससोबतच एक हेल्पलाईन नंबर सुरू केला जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्यांना सोशल मीडिया टीममध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांची माहिती संकलित करणार आहे.
काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘सोशल मीडिया टीममध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांची आधी चौकशी केली जाणार आहे.
ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जाणार आहेत,’ अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.